नमस्कार मित्रांनो,
असं म्हणतात की ‘भाषा टिकली तर संस्कृती टिकते’, पण माझ्या मते हे अर्धंसत्य आहे. ‘भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती जपली तर भाषा जपायलासुद्धा मदत होते’ — हे झालं पूर्ण वाक्य. वाचणाऱ्या लोकांपैकी बऱ्याच जणांना हे वाक्य जरा अस्वस्थ करू शकतं, पण आपल्याला एक गोष्ट नाकारून चालणार नाही ती म्हणजे, भाषा आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत.
एका छोट्या उदाहरणावरून पाहूया; इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा त्यांना इथली संस्कृती मोडीत काढायची होती, आणि म्हणून त्यांनी अभ्यासक्रमामधून आपल्या भारतीय भाषाच काढून टाकल्या. माणसाला त्याच्या भाषेपासून तोडलं की त्याच्या संस्कृतीपासून आणि इतिहासापासून तो आपोआप तुटतो, असं त्यांचं सोपं म्हणणं होतं.
Just माहितीसाठी वाचकांना मराठी भाषेबद्दलचे ब्लॉग्स तर वाचायला मिळतीलच, पण त्यासोबत आपली महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी संस्कृतीबद्दलची माहिती देणारे ब्लॉग्ससुद्धा तुम्हाला वाचायला मिळणार आहेत.
■ मराठी सण
महाराष्ट्रामध्ये जे सण साजरे केले जातात, किंवा मराठी माणसं जे सण परदेशात साजरे करतात, त्यांच्या मागे कथा आहेत, शास्त्र आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आपली संस्कृती आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये आजही जे सण साजरे होतात त्याबद्दल आपल्याला क्वचितच माहिती असते, त्यांच्या मागच्या कथा माहिती असतात. त्याबद्दलही माहिती वाचकांना इथे वाचायला मिळेल.
■ मराठी परंपरा
प्रत्येक सण, वार आणि काही ठराविक प्रसंगांच्या निमित्ताने आपल्याकडे काही प्रथा पार पडतात. या प्रथा पारंपरिक वारसा घेऊन पुढे आलेल्या असतात. या ब्लॉग्सच्या मालिकेमध्ये आपण मराठी परंपरांबद्दल जाणून घेणार आहोत. याशिवाय कोणत्या गोष्टींना ‘रूढीं’चे स्थान आहे आणि कोणत्या गोष्टींना ‘परंपरे’चे स्थान आहे, याबद्दलही वाचकांना इथे वाचायला मिळेल.
■ मराठी खाद्यसंस्कृती
जसं आपल्या सर्वांना या गोष्टीची जाण आहे की महाराष्ट्राला खाद्यसंस्कृतीचासुद्धा वारसा लाभलेला आहे, म्हणूनच Just माहितीसाठी आपण या ब्लॉग्सच्या मालिकेमधून मराठी खाद्यसंस्कृतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. (हे लिहिता लिहिता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मिळणारे अस्सल मराठी पदार्थ डोळ्यांसमोर आले आहेत आणि तोंडाला पाणी सुटलं आहे!) तसंच प्रत्येक पदार्थामागे, प्रत्येक मेजवानीमागे ज्या कथा आहेत त्याबद्दलसुद्धा आपण जाणून घेणार आहोत.
■ मराठी पोशाख
आजकाल फॅशन जरी खूप लवकर बदलत असली, तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये अजून बरेच असे पोशाख आहेत जे जुन्या काळापासून आजपर्यंत टिकून आहेत. हे पोशाख असे असण्याच्या मागे नेमकी काय कारणं आहेत? कोणतं भौगोलिक कारण आहे, कोणतं शास्त्रीय आधार असलेलं कारण आहे? याबद्दल वाचकांना सविस्तर वाचायला मिळेल.
पुढील अनेक ब्लॉग्समध्ये आपण मराठी संस्कृतीबद्दल आणि मराठी संस्कृतीशी निगडित असलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. पण तोपर्यंत हे लक्षात असू द्या: भाषा टिकली तर संस्कृती टिकते!
म्हणूनच मराठी फक्त बोलू नका; मराठी वाचा, मराठी लिहा आणि आपल्या समृद्ध भाषेचा वारसा अजून समृद्ध करा!

Leave a Reply