Just माहितीसाठी

मराठी आणि महाराष्ट्राबद्दल बरंच काही…

मराठी भाषेचा समृद्ध वारसा आणि गमतीजमती | Marathi Bhasha & Culture

नमस्कार मित्रांनो,

मराठी भाषा बोलणाऱ्यांसाठी आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा ब्लॉग खास असणार आहे. मराठी भाषेबद्दलचा हा पहिलाच ब्लॉग असला, तरी Just महितीसाठी आपण मराठी भाषेबद्दलच्या काही खास गोष्टी या मालिकेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

■ मराठी भाषेतल्या कथा

बऱ्याचदा आपण रोजच्या आयुष्यात मराठी बोलताना अनेक म्हणींचा सहज वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? यातील प्रत्येक शब्दामागे आणि म्हणीमागे एक रंजक कथा लपलेली असते. या शब्दांच्या अन् म्हणींच्या मागच्या कथा आपल्याला इथे वाचायला मिळतील. याशिवाय मराठी भाषेतील अनेक अप्रचलित कथा आणि गोष्टींबद्दलही आपण या ब्लॉगमालिकेतून जाणून घेणार आहोत.

■ मराठी व्याकरण

मराठी भाषा बोलायला तशी सोपी आहे. भाषा बोलताना शुद्ध-अशुद्ध, शहरी किंवा गावरान असा भेदभाव नसतो, हे माझं प्रांजळ मत आहे. पण व्याकरणदृष्ट्या विचार केला, तर भाषा शुद्ध किंवा अशुद्ध असू शकते. म्हणूनच, भाषा सोपी असली तरी तिचे व्याकरण सांभाळून ती बोलता येणे महत्त्वाचे ठरते. मराठी ही अत्यंत संवेदनशील भाषा आहे. आपण इतर कोणत्याही भाषा बोलत किंवा शिकत असू, तरी शब्दांच्या अर्थांइतकेच लक्ष व्याकरणाकडेही दिले गेले पाहिजे. म्हणूनच मराठी भाषेचे व्याकरण आणि त्यातील गमतीजमती आपण या ब्लॉग्समध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

■ मराठी भाषा आणि संस्कृती

असं म्हणतात, ‘दर बारा कोसांवर भाषा बदलते’. इतर कोणत्याही राज्याच्या भाषेपेक्षा आपली मराठी कणभर श्रेष्ठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण महाराष्ट्रात जशी ठिकठिकाणची खाद्यसंस्कृती वेगळी आहे, तशीच तिथली बोलीभाषाही समृद्ध आहे. किंबहुना, अनेकदा खाद्यसंस्कृतीचा प्रभाव भाषेवर पडलेला दिसून येतो. या रंजक विषयावरही तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

■ मराठी भाषेतील परकीय शब्द

आपण रोजच्या बोलण्यात वापरत असलेले कुलूप-किल्ली, कागद, सामान, आरसा यांसारखे अनेक शब्द मूळ मराठी नसून ते फारसी किंवा इतर भाषांतून आलेले आहेत. हे ऐकल्यावर सुरुवातीला थोडं नवल वाटेल, पण कालानुरूप हे शब्द मराठीत इतके रुळले की ते आपलेच झाले. हे शब्द कुठून आले? कसे आले? रोजच्या धावपळीत हे प्रश्न पडत नसले, तरी जेव्हा पडतील तेव्हा त्यांची उत्तरे तुम्हाला या ब्लॉगमालिकेत नक्की मिळतील.

■ मराठी भाषेचा इतिहास

पूर्वीच्या काळात मराठी कशी बोलली जायची आणि काळाच्या ओघात त्यात कसे अन् का बदल होत गेले? हे जर आपल्याला माहीत असेल, तर आपली भाषा जपण्यासाठी आपणही काहीतरी योगदान दिले याचे एक वेगळेच समाधान उराशी राहील. याच समाधानासाठी मराठी भाषेच्या इतिहासाची रंजक सफर आपण इथे करणार आहोत.

■ मराठी साहित्य

मराठीत आजवर शेकडो पुस्तके लिहिली गेली आहेत. प्रत्येक पुस्तक काहीतरी नवीन शिकवून जाते. पण “मला एखादे पुस्तक वाचायचे आहे, पण त्यात नक्की काय दडले असेल? माझ्या आवडीच्या विषयावर ते आधारित असेल का? किंवा पुस्तकाचे मुखपृष्ठ जितके आकर्षक आहे, तितकाच मजकूर चांगला असेल का?” असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात असतात. याशिवाय मराठीत अनेक अप्रतिम काव्यसंग्रह आहेत. या सर्व साहित्याचा परिचय आणि समीक्षा तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

थोडक्यात काय, तर मराठी भाषेचे आणि तिच्या विविध पैलूंचे दर्शन आपल्याला इथे घडणार आहे. भाषेतील गमतीजमती असोत की व्याकरण सांभाळण्याचे नियम, सर्व काही सोप्या आणि रंजक उदाहरणांमधून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

भाषा टिकली तरच संस्कृती टिकते! म्हणूनच मराठी फक्त बोलू नका; मराठी वाचा, मराठी लिहा आणि आपल्या समृद्ध भाषेचा वारसा अधिक समृद्ध करा!