Just माहितीसाठी

मराठी आणि महाराष्ट्राबद्दल बरंच काही…

एक गाव एक गणपती: परंपरा, इतिहास आणि गावाच्या विकासामागचं आर्थिक गणित | Just Mahitisathi

नमस्कार मित्रांनो, सर्वांच्या घरी गणपती बाप्पा बसले असतील. काहींच्या घरचे बाप्पा दिढ दिवसाचे असतात, काहींच्या घरचे बाप्पा तीन दिवसांसाठी येतात, बऱ्याच लोकांच्या घरी बाप्पांचं विसर्जन पाचव्या दिवशी केलं जातं. घराजवळच्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा केला जात असेल. आजकाल तर प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक चौकामध्ये एका स्वतंत्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते.

यावर्षी बाप्पांचं आगमन होण्याआधी मी इंटरनेटवर काही ठिकाणी “एक गाव एक गणपती” या संकल्पनेबद्दल वाचलं. जसं नाव अगदी तशीच आणि तितकीच सोपी संकल्पना. एक गाव एक गणपती म्हणजे अर्थातच एका गावाचा असा एकच गणपती. प्रत्येकाने आपापल्या घरी स्वतंत्र गणपती न बसवता, संपूर्ण गावाने मिळून असा एकंच गणपती बसवायचा, संपूर्ण गावाने मिळून गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पांचा भरपूर मानपान करावा, बाप्पांचे भरपूर लाड करावे आणि मग चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांना “पुढच्या वर्षी लवकर या!” म्हणत विसर्जित करायचं. अशी हि परंपरा आहे.

एक गाव एक गणपती ही परंपरा कशी आणि कुठून सुरु झाली याबद्दल बरीच माहिती इंटरनेटवर आपल्याला सापडेल. कुणाच्या म्हणण्याप्रमाणे ही प्रथा कोकणात सुरु झाली तर कुणाच्या म्हणण्याप्रमाणे मुंबई जवळील ठाणे जिल्ह्यापासून ही संकल्पना सुरु झाली. हि परंपरा कुठून सुरु झाली याबद्दल अनेक मतं जरी असली तरी ही परंपरा का सुरु झाली याचं एक ठोस कारण सगळीकडे सापडतं ते म्हणजे गावातील व्यक्तींचा सणवार चालू असताना वयक्तिक खर्च कमी व्हावा म्हणून असा सार्वजनिक गणेशोत्सव. अर्थात या व्यतिरिक्त अजून बरेच मतं असतील आणि असावेतही. पण महत्वाची बाब अशी की महाराष्ट्रामधील अनेक गावांमध्ये ही संकल्पना मानली गेलेली आहे आहे आणि मागच्या कित्येक तरी दशकांपासून ज्या त्या गावातील लोक मिळून संपूर्ण गावाचा असा एकंच गणपती बसवतात.

वरवर पाहता आपल्याला लक्षात येतं की एका गावाने एकंच गणपती बसवला म्हणजे, प्रत्येकाने आपापल्या घरी स्वतंत्र गणपती बसवल्यानंतर ज्या प्रकारचे प्रदुषणं होतात ते या परंपरेमुळे बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात. बाकी या मुद्द्याबद्दल विचार करण्याइतके सगळेच वाचक सुज्ञ आहेत त्यामुळे फार बोलायला नको. पण यासगळ्याच्या खोलवर एक मुद्दा आहे तो दुर्लक्षित राहतो आणि बरेच लोक जेव्हा अशा सार्वजनिक उत्सवांचा मोठ्या उत्साहाने श्रीगणेशा करतात तेव्हा ही मंडळी, एक महत्वाचा मुद्दा विसरल्याचं आपल्या लक्षात येतं. तो म्हणजे आर्थिक मुद्दा.

वर लिहिल्याप्रमाणे गावातील लोकांचा वैयक्तिक खर्च कमी व्हावा आणि प्रत्येकाने अगदी सगळंच नाही पण स्वतःची गरज भागल्यानंतर जो पैसा शिल्लक राहतो, त्या मधला पैसा (इच्छेनुसार) त्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी द्यावा असा या परंपरेचा पूर्वार्ध आहे. उत्तरार्ध नेमका विसरला जातो. तो म्हणजे उत्सव साजरा झाल्यानंतर जे पैसे शिल्लक राहतात ते गावाच्या विकासासाठी वापरले जातात. गावचा विकास म्हणजे अगदीच रस्त्यांसाठी किंवा इमारतींसाठी नाही तर गावातील शाळेसाठी. गणपती ही विद्येची देवता आहे. तेव्हा बाप्पांच्या उत्सवातून शिल्लक राहिलेले पैसे हे विद्यार्जनासाठी कामी येताहेत ही गोष्ट बाप्पांच्या ही मनाला सुखावणारी गोष्ट आहे.

आजकालच्या सार्वजनिक गणेशोत्सवांबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *