श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. पराक्रमी पुरुष. राजकारण आणि मुत्सद्देगिरीची जाण असलेला योद्धा. पण बाजीरावांची शोकांतिका अशी की, लोकांना त्यांच्या नावाशी त्यांचे साहसी पराक्रम जोडण्यापेक्षा मस्तानीचे नाव जोडणे जास्त महत्त्वाचे आणि गरजेचे वाटले.
आजही कित्येक लोकांच्या मनामध्ये ‘बाजीराव’ म्हटले की पुढचा शब्द ‘मस्तानी’ हाच येतो. असे का बरे?
एवढ्यात कौस्तुभ कस्तुरे यांचे ‘पेशवाई’ हे पुस्तक वाचणे सुरू आहे. लेखकाने हे पुस्तक अत्यंत अभ्यासपूर्वक व पूर्ण संशोधनादिशी लिहिले असले तरी हे पुस्तक वाचताना आपण पेशवाईची गोष्ट वाचत आहोत, असेच वाटते. इतक्या सोप्या भाषेत सर्व घटना, व्यक्ती आणि व्यक्तींची मांडणी केली आहे. हे पुस्तक वाचताना लक्षात आलेल्या काही गोष्टी:
१. मुळात, भारतीय जनतेला चित्रपटातून जो बाजीराव दाखवला गेला, त्याहीपेक्षा कैकपटीने बाजीराव थोर होते.
२. बाळाजी विश्वनाथ भट (बाजीरावांचे वडील) यांच्यापासून पेशवाई नेहमी छत्रपतींच्या गादीशी एकनिष्ठ राहिलेली आहे.
३. बाजीरावांनी मस्तानीशी विवाह केला तो प्रेमापोटी नव्हे, तर राजकारणासाठी. पुढे जाऊन स्वराज्याला छत्रसाल राजाची आणि त्यांच्या आसपासच्या इतर राज्यकर्त्यांची गरज भासू शकते, म्हणून हा विवाह होता.
४. बाजीरावांनी मस्तानीशी विवाह केल्यानंतर त्यांच्या घरी बरेच मतभेद होते, ही गोष्ट नितांत खरी आहे. परंतु, पुढे जेव्हा बाजीरावांचा आणि त्यानंतर काही काळानंतर मस्तानीचाही मृत्यू झाला, तेव्हा चिमाजी आप्पा, नानासाहेब (बाजीरावांचे पुत्र) आणि घरातील इतर सदस्यांनी मिळून समशेरबहाद्दरचा फार मायेने सांभाळ केला. समशेरबहाद्दरला कधी सावत्र असल्याची जाणीवही त्यांनी होऊ दिली नाही.
आतापर्यंत जेवढे वाचन झाले आहे, त्यावरून समजलेल्या अनेक गोष्टींपैकी या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसे जसे वाचन पुढे जाईल, तसे तसे Just माहितीसाठी समालोचन लिहून येथे प्रसिद्ध करत राहीन.
वास्तविक पाहता, संपूर्ण पुस्तकाचे समालोचन लिहिणे इष्ट ठरले असते; पण पेशवाईची गोष्ट काही मोजक्या शब्दांमध्ये बसवणे मला तरी शक्य वाटत नाही. म्हणूनच ही ब्लॉगची मालिका लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.
जय महाराष्ट्र!


Leave a Reply