नमस्कार मित्रांनो,
आजचा विषय थोडासा भावनिक आहे, पण यावर बोलणं अत्यंत गरजेचं आहे. विषय आहे — ‘मराठी भाषेचा वापर कसा वाढवला जाऊ शकतो?’
थेट उत्तराकडे जाण्याआधी मराठी भाषेचा वापर का कमी झाला, यामागील कारणांचा शोध घेणं इष्ट ठरेल. मराठी भाषेचा वापर कमी होण्यामागची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:
- इंग्रजांचं राज्य आल्यानंतर त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानात शिक्षणासाठी इंग्रजी भाषेची केलेली सक्ती.
- इंग्रजीचा इतका अतिरेक झाला की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतात इंग्रजी बोलणाऱ्यांचे प्रमाण वाढतच गेले.
- जेव्हा आधुनिक महाराष्ट्राची रचना होत होती, त्या काळात अनेक परभाषीय लोक महाराष्ट्रात स्थायिक झाले; ज्यामुळे भाषांची सरमिसळ झाली असावी.
■ इंग्रजांचे धोरण आणि संस्कृतीवर झालेला घाला
भारत जेव्हा पारतंत्र्यात गेला, तेव्हा इंग्रजांनी इथली मूळ संस्कृती मोडीत काढण्याचे धोरण अवलंबले. “माणसाला त्याच्या भाषेपासून — म्हणजेच संवादाच्या मुख्य माध्यमापासून तोडलं, की तो आपोआप एक कोरी पाटी बनतो,” हे गणित त्यांना पक्कं माहीत होतं. थोडक्यात काय, तर जर भाषाच टिकली नाही, तर संस्कृतीसुद्धा टिकणार नाही! इंग्रजांना हेच हवे होते. म्हणूनच त्यांनी शिक्षणामध्ये इंग्रजीची सक्ती केली आणि स्थानिक भाषा अभ्यासक्रमात राहू नयेत याची खबरदारी घेतली. याचा परिणाम असा झाला की, कालांतराने भारतीय समाज इंग्रजीच्या प्रभावाखाली येत गेला.
■ मानसतज्ज्ञता आणि ४ पिढ्यांचा प्रभाव
सामान्य मानसशास्त्राचा विचार केला, तर आपल्या असे लक्षात येते की पिढ्यानपिढ्या जी गोष्ट शिकवली जाते, ती सहज मागे सोडणे फार कठीण असते. इंग्रजांनी भारतावर सुमारे २०० वर्षे राज्य केले. एका पिढीचा कार्यकाळ ५० वर्षांचा मानला, तरी इंग्रजीच्या जाचाखाली भारतीयांच्या तब्बल ४ पिढ्या वाढल्या. त्यामुळे स्थानिक भाषांचा वापर कमी होणे हे अपेक्षित नसले, तरी स्वाभाविक होते. काळाच्या ओघात जुन्या संस्कारांनुसार आणि कार्यपद्धतीनुसार इंग्रजीच्या वापराशिवाय पानही हलेनासे झाले.
■ व्यवहाराची भाषा आणि हिंदीचा वाढता प्रभाव
भाषावार प्रांतरचनेची सुरुवात झाली, त्या काळात महाराष्ट्रात अनेक उत्तर भारतीय नागरिक स्थायिक झाले होते. त्यांची मालमत्ता, घरे आणि व्यवसाय महाराष्ट्रातच असल्याने ते स्वतःच्या भाषेच्या राज्यात परत जाण्याचा प्रश्नच नव्हता. बाजारातील बहुतांश विक्रेते आणि व्यापारी हिंदीभाषिक असल्यामुळे रोजच्या व्यवहारातील भाषा आपोआप हिंदीकडे झुकत गेली. मराठी माणसाला आपली भाषा विसरायची होती अशातला भाग नाही, पण व्यवहाराची भाषा नाकारून चालणे बहुतेक मराठी माणसाच्या ‘Risk Taking Ability’ला न झेपणारे होते; ज्यामुळे हिंदीचा वापर वाढत गेला.
■ मग मराठी भाषेचा वापर कसा वाढवता येईल?
हे तर झाले प्रश्न! पण मूळ प्रश्न राहतोच — मराठी भाषेचा वापर कसा वाढवायचा?
मला हा प्रश्न फारसा अवघड वाटत नाही. आजची भाषा जरी संमिश्र झालेली असली, तरी त्या मिश्रणात मराठीचे मूळ अस्तित्व आजही टिकून आहे. पण “मराठी टिकणारच आहे, तर आपण प्रयत्न का करायचे?” असा प्रश्न कोणाला पडू शकतो.
त्याचे सोपे उत्तर म्हणजे — मराठी ही आपली आई आहे! विचार करा, आपल्या घरात आपली आई आहे; तिची तब्येत जरा नादुरुस्त आहे. ती स्वतःची काळजी घ्यायला समर्थ असली, तरी आपण मुला म्हणून तिची काळजी घेणारच नाही का? नक्कीच घेणार! तसंच, मराठी भाषा टिकून राहण्यासाठी समर्थ आहे; पण तिचा वापर वाढवणे, मातृभाषेला अधिक समृद्ध करणे आणि पुढच्या पिढीला मराठी संस्कृतीची जाण करून देणे हे आपले कर्तव्य आहे.
वापर वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो?
- रोजच्या व्यवहारात जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न करावा.
- दैनंदिन आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना योग्य मराठी पर्याय शोधून ते वापरण्याची सवय लावावी.
- जमेल तितके मूळ मराठी साहित्य वाचावे आणि जुने दर्जेदार मराठी चित्रपट पाहावेत; ज्यामुळे आपला शब्दसंग्रह वाढेल.
अजूनही अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्यांबद्दल Just माहितीसाठी च्या माध्यमातून आपण चर्चा करतच राहणार आहोत. पण तोपर्यंत हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा!

Leave a Reply