Just माहितीसाठी

मराठी आणि महाराष्ट्राबद्दल बरंच काही…

ओटीतील ‘खण’: फक्त एक कापड की स्त्रीच्या गृहसामर्थ्याचा सन्मान?

आपण बऱ्याचदा आपल्या आईच्या तोंडून किंवा इतर स्त्रियांकडून ऐकतो की, “देवीची खणा-नारळाने ओटी भरावी.” तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुवासिनींचीही खणा-नारळाने ओटी भरली जाते. प्रथमदर्शनी हे वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपल्याला असे वाटते की, ही फक्त एक रूढ परंपरा आहे किंवा दिसायला छान दिसते म्हणून आपण ओटीसाठी खणाचे कापड वापरतो.

पण सखोल विचार केला असता आपल्या असे लक्षात येते की, खणाच्या कापडावर जे नक्षीकाम केलेले असते, ते केवळ सौंदर्यासाठी नसते; तर ते संपूर्ण कुटुंबाला जोडून ठेवणाऱ्या गृहिणीचे प्रतीक असते.

‘खण’ शब्दाचा रंजक इतिहास पूर्वीच्या काळात कोकणात किंवा महाराष्ट्रात जी घरे बांधली जायची, ती खणांच्या आधारावर मोजली जायची. म्हणजेच घराचे टप्पे (sections) मोजण्याचे ते एक साधन असायचे आणि लाकडी खांबांच्या आधारे एका ओळीत जोडलेल्या खोल्यांना ‘खण’ म्हटले जायचे. हा लाकडी खांब चौकोनी असायचा; आणि खणाच्या कापडावरही चौकोनीच नक्षीकाम असते.

स्त्रीच्या ‘घर जोडण्याच्या’ कौशल्याचा सन्मान थोडक्यात सांगायचे तर, जेव्हा एखाद्या स्त्रीची खणा-नारळाने ओटी भरली जाते, तेव्हा तो तिच्या घराला जोडून ठेवण्याच्या कौशल्याचा गौरव असतो. तिच्या घराप्रती असलेल्या प्रेमाचा तो सन्मान असतो. “आजवर जसे घर जोडून ठेवले आहेस, तसेच पुढेही जोडून ठेव,” हा आशीर्वाद आणि आजवरच्या कर्तृत्वाचा आदर त्या खणाच्या कापडात दडलेला असतो.

त्रिकोणी घडी आणि रंगांमागचे शास्त्र शिवाय, त्या खणाच्या कापडाची घडी ‘त्रिकोणी’ केली जाते; कारण बांधणीचा (Architectural Design) विचार केला तर त्रिकोण हा सर्वात भक्कम आकार मानला जातो. म्हणूनच आपण जेव्हा मोठमोठ्या पुलांची रचना पाहतो, तेव्हा ती त्रिकोणी आकारावर आधारित असल्याचे लक्षात येते.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या खणाच्या कापडाचा रंग प्रामुख्याने लाल किंवा हिरवा असतो. लाल रंग हा ‘आदिशक्तीचे’ प्रतीक आहे, तर हिरवा रंग हा ‘निसर्गाचे आणि समृद्धीचे’ प्रतीक आहे. निसर्ग जसा स्वतःचे नवचैतन्य जपत राहतो, तसेच स्त्री घर समृद्ध ठेवते.

थोडक्यात काय तर… “ओटीतील खण म्हणजे घराला जोडून ठेवणाऱ्या आणि घरातले मांगल्य टिकवून ठेवणाऱ्या सक्षम स्त्रीचा सन्मान असतो.”

संस्कृती टिकवण्याची आपली जबाबदारी आजकाल आपण पाहतो की ओटी भरताना साधा ब्लाउज पीस दिला जातो. पण खणामागचे हे शास्त्र लक्षात ठेवून इथून पुढे ओटी भरताना खणा-नारळाचाच वापर केला गेला, तरच आपली मराठी संस्कृती आणि परंपरा खऱ्या अर्थाने टिकून राहील आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल.

ओटीचेही बरेच प्रकार असतात; त्याबद्दल आपण पुढच्या ब्लॉगमध्ये वाचणारच आहोत.

पण तोपर्यंत… मराठी भाषेबद्दल फक्त ऐकू नका, तर मराठी भाषा व्यवहारात आणा; मराठी साहित्याचे वाचन करा आणि आपल्या समृद्ध मराठीचा वारसा अधिक समृद्ध करा!