Just माहितीसाठी

मराठी आणि महाराष्ट्राबद्दल बरंच काही…

“तावून सुलाखून निघणे” या वाक्प्रचाराचा अर्थ आणि रंजक इतिहास | मराठी वाक्प्रचार | Just Mahitisathi

नमस्कार मित्रांनो, Just महितीसाठीचा मराठी भाषेवरील हा रंजक ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल! आपल्याला माहिती आहे की मराठी भाषा, खरंच एक रंजक भाषा आहे, आणि मराठीतील रंजकतेचं श्रेय बऱ्याच घटकांना जातं, त्यापैकी एक घटक म्हणजे मराठी वाक्प्रचार. कोणत्याही भाषेतील वाक्प्रचार हा त्या-त्या भाषेचा एक बहुमोल अलंकार असतो असंच मला वाटतं.

भाषा हे संवाद साधण्याचं साधन असतं, आणि म्हणूनच भाषा प्रवाही आणि प्रभावी दोन्ही असते. याच भाषेच्या प्रवाहामध्ये, अनेक बोलीभाषांमध्ये अनेक वाक्प्रचार तयार झालेले आहेत. त्यामुळे “मराठी भाषेतील वाक्प्रचारांची एकूण संख्या किती?”ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं जवळजवळ अशक्य आहे.

“तावून सुलाखून निघणे!” हा मराठी भाषेमध्ये एक बहुश्रुत वाक्प्रचार आहे. Just महितीसाठी सांगतो ज्याचा अर्थ होतो, कठीण परीक्षा वा कसोटीतून पार लागून अधिक गुणी आणि परिपक्व होऊन बाहेर पडणं. हा झाला वाक्प्रचाराचा अभिप्रेत अर्थ. आता आपण जाणून घेऊया की हा वाक्प्रचार नेमका कसा तयार झाला. ‘तावून सुलाखून निघणे!’ हा वाक्प्रचार तावून आणि सुलाखून किंवा तावणे आणि सुलाखणे या २ शब्दांपासून तयार झालेला आहे.

‘तावणे’ हा शब्द प्रथमदर्शनी आपल्याला ओळखीचा वाटतो कारण, ‘तावातावात बोलणे!’ इत्यादी गोष्टी आपल्या कानावर पडलेल्या असतात. माझ्या मते तावणे हा शब्द ‘तापवणे’चा अपभ्रंश असावा. आणि म्हणूनच पुढे सोनं तापवण्याच्या प्रक्रियेला तावणे असं नाव पडलं असावं. ह्या वाक्प्रचाराचा उत्तरार्ध म्हणजे ‘सुलाखणे’. ह्या शब्दाचा संबंध सोन्याची शुद्धता तपासण्याशी जोडला जातो. सुलाखणे हा शब्द सुलाखवरून आला आहे, ज्याचा अर्थ होतो सोन्याच्या दागिन्यांमध्ये किंवा वस्तूमध्ये शुद्धता तपासण्यासाठीचं छिद्र. आणि म्हणूनच सुलाखणे म्हणजे सोन्याच्या दागिन्यांमध्ये, त्यांची शुद्धता तपासण्यासाठीची प्रक्रिया.

जेव्हा आपण सुलाख हा शब्द वाचतो तेव्हा आपल्याला हा शब्द ऐकल्यासारखा वाटला असेल, पण आपण मुळात सुलाख हा शब्द न ऐकता ‘सुराख’ हा उर्दू किंवा पर्शियन शब्द अनेकदा चित्रपटांमध्ये ऐकलेला आहे. ज्याचाही अर्थ छिद्र असाच होतो. आता हे वाचताना अजून एक प्रश्न मनामध्ये येऊ शकतो तो म्हणजे, सुलाखवरून सुराख शब्द तयार झाला? की सुराखवरून सुलाख शब्द तयार झाला? भाषेचा अभ्यास करताना आपण भूगोलाचाही आढावा घेतला की आपल्याला असं लक्षात येतं की आधीच्या काळापासून ते आतापर्यंत भारत किंवा पूर्वेतले देश हे मध्य पूर्वेतून सोनं, सोन्याचे दागिने इत्यादी आयात करतात. आणि ह्या दागिन्यांच्या देवाणघेवाणीत शब्दांचीसुद्धा देवाणघेवाण झाली आहे हे आपल्या लक्षात येतं.

अर्थात ह्यात कमीपणा वाटण्यासारखं काहीच नाही, उलट कुठल्याशा वेगळ्या भाषेतून आपल्या मराठीकडे जे शब्द येतात त्यात जेव्हा मराठीचा गोडवा उतरतो त्यावेळी ते शब्दही स्वतःचं मूळ रूप विसरायला तयार होतात. हेच आपल्या मायमराठीचं वैशिष्ट्य आहे. मराठी भाषेमध्ये दडलेल्या अजून अशा रंजक गोष्टी आपल्याला वाचायला मिळणारच आहेत पण तोपर्यंत… ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो… मराठी भाषेबद्दल फक्त ऐकू नका, तर मराठी भाषा व्यवहारात आणा; मराठी साहित्याचे वाचन करा आणि आपल्या समृद्ध मराठीचा वारसा अधिक समृद्ध करा!