मनुष्य हा एक कुतूहल असलेला प्राणी आहे. क्यूरियोसिटी हा मनुष्याचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. याच क्यूरियोसिटीमुळे, कुतूहलामुळे माणूस आज जिथे आहे तिथे पोहोचू शकलाय. विचार करा, माणसामध्ये कुतूहल नसलं असतं तर त्याने ते पहिलं फळ खाऊन पाहिलं असतं का? पहिली शिकार करून पाहिली असते का? आग कशी पेटते हे समजलं असतं का? चला मागचा काळ बाजूला ठेवूया, आताचंच उदाहरण पाहूया! माणसाला दिवसभरात किती प्रश्न पडतात, किती गोष्टींबद्दल कुतूहल तयार होतं. खूप जास्त. पण आपण या कुतूहलाचं काय करतो?
आपण प्रश्न विचारायला विसरलो आहोत का? असा प्रश्न मला सतत पडत असतो आणि मी बऱ्याच जणांना विचारून पाहिलं आहे. असा प्रश्न विचारल्यानंतर बऱ्याच जणांची आलटून पालटून ही उत्तरं असायची.
- प्रश्न पडायचे पण विचारण्याची हिंमत होत नव्हती.
- लहानपणी जेव्हा जेव्हा प्रश्न विचारायचो/विचारायचे त्यावेळी “तू मोठा झालास की तुला कळेल.” असं म्हणत आम्हाला टाळलं.
- आमच्या प्रश्नावर “काय करायचय तुला?” असा प्रतिप्रश्न केला जायचा आणि आम्ही गप्प बसून घ्यायचो.
आपण सगळेच लहानपणी खूप प्रश्न विचारतो, पण मग बऱ्याच जणांना वर लिहिली आहेत तशी उत्तरं मिळतात आणि मग आपण तरुणपणी प्रश्न विचारायचे विसरून जातो.
आणि जेव्हा मी ही उत्तरं ऐकली तेव्हा मला लक्षात आलं की, माणसाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होऊन प्रश्न पडायचे आणि त्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत न थांबण्याच्या गुणधर्मामुळे माणूस उत्क्रांत होऊ शकला.
आणि जेव्हा मी म्हणतो की आपण प्रश्न विचारायला विसरलो आहोत का? तेव्हा त्याच्या मागे नेमका प्रश्न असतो तो म्हणजे “ज्यामुळे माणसाची प्रगती होत आलीये तोच गुणधर्म आपण विसरलो आहोत का?”
Just माहितीसाठी का असेना, आपल्या मनात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं शोधण्याची जबाबदारी ही सर्वस्वी आपली आहे. आता बऱ्याच वाचकांना असा ‘प्रश्न’ पडू शकतो की “नाही प्रश्न विचारले, किंवा नाही मिळाली उत्तरं तर आयुष्य थांबणारे का?” नाही आयुष्य तर थांबणार नाही पण आपली वैचारिक वाढ नक्कीच थांबेल. कुतूहल ही मेंदूची भूक असते. कुतूहल ही बौद्धिक भूक आहे. ती भूक भागवली नाही तर जसं शरीराला जेवण न मिळाल्याने शरीर अशक्त होतं तसा मेंदू ही अशक्त होऊ लागतो. आणि मेंदू अशक्त झाला की मनुष्याची एकंदरीतच वाढ थांबून जाते, असं आपण सगळ्यांनी कुठेना कुठे ऐकलं किंवा वाचलेलं असेलच. त्याबद्दल वेगळं लिहायला नको.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आपण प्रश्न विचारायचे बंद केले, आपण उत्तरं शोधली नाहीत तर पुढची पिढी आपल्याला मूर्खांच्या यादीत मोजायलाही कमी करणार नाही. कारण पुढची पिढी कुतूहलाने भरलेली आहे, त्यांच्याकडे जन्माला येण्याआधीच बरेच प्रश्न असणारेत, जन्माला आल्यानंतर, जगाची जाण आल्यानंतर पडणाऱ्या प्रश्नांचा तर ‘सवाल’च नको. आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली नाहीत तर पुढच्या सगळ्या शक्यता आपण सर्वंच जाणता.
आपण जेव्हा पुढच्या पिढीला सांगू की आपली भाषा जपली पाहिजे, आपली संस्कृती जपली पाहिजे तेव्हा “हे सगळं नेमकं का आणि कुणासाठी करायचंय?” असा प्रतिप्रश्न आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं का करायंचंय? याचं उत्तर मिळालं की कुणासाठी करायचंय याचं उत्तर आपोआपच मिळतं.
आणि Just माहितीसाठीच्या ब्लॉग मालिकांमध्ये, आणि सोशल मीडिया कंटेंट मध्ये आम्ही मराठी माणसाला पडलेल्या आणि कदाचित न पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो.
Just माहितीसाठी म्हणून हा ब्लॉग तुमच्या वाचक मित्रांसोबत नक्की शेअर करा! तोपर्यंत मराठी भाषेबद्दल फक्त वाचू आणि ऐकू नका तर, मराठी बोला, मराठीचा जास्तीत जास्त वापर करा! जय महाराष्ट्र!


Leave a Reply