Just माहितीसाठी

मराठी आणि महाराष्ट्राबद्दल बरंच काही…

लग्नघडीची महत्त्वाची प्रथा: अक्षता का आणि कशा टाकाव्यात? (एक महत्त्वपूर्ण बदल)


मराठी लग्नांमध्ये मंगलाष्टका चालू असताना नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकण्याची प्रथा आहे हे आपण सगळेच जाणतो. पण आपण सहज म्हणून तरी कधी विचार केलाय का, की लग्नामध्ये हे असे ‘तांदूळ’ डोक्यावर का टाकले जातात?

Just माहितीसाठी आपल्याला माहिती असावं म्हणून सांगतो, मंगलाष्टकांच्यावेळी जे तांदूळ डोक्यावर टाकले जातात त्यांना ‘अक्षता’ म्हणतात. अक्षता हा शब्द अ+क्षता असा तयार झालेला आहे. आता ‘क्षता’ हे संस्कृत शब्द ‘क्षति’ चं मराठी रूप आहे ज्याचा अर्थ होतो, तुटलेलं किंवा किंवा खंड असलेलं. आणि जेव्हा ‘क्षता’ या शब्दासोबत ‘अ’ हा उपसर्ग लागतो त्याचा अक्षता असा शब्द तयार होतो ज्याचा अर्थ असतो क्षति न झालेला किंवा खंड न पावलेला असा अखंड. आणि म्हणूनच अक्षता म्हणून तुकडा न पडलेला, अखंड असा तांदूळ लग्नाच्या वेळी वापरला जातो.

तांदूळ अखंड असण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे, अखंड तांदूळ हे नवविवाहितांच्या अखंड सोबतीसाठी, पाहुणे मंडळींनी आणि वडीलधाऱ्यांनी दिलेले आशीर्वाद असतात. यामध्ये एक प्रकारचा प्रतीकवाद अर्थात सिम्बोलिस्म दडलेला आहे. म्हणूनच या अक्षता.

तुम्ही जेव्हा लग्नामध्ये जाल त्यावेळी तुम्ही पाहिलं असेल की अक्षता बनवण्यासाठी जो तांदूळ वापरला जातो तो प्रत्यक्षात मात्र अनेकदा तुटलेला तांदूळ वापरला जातो. आणि याव्यतिरिक्त ते तांदूळ डोक्यावर पडण्याऐवजी ८० टक्के तांदूळ हे इतरांच्या डोक्यावर पडून, पायाखाली अक्षरशः तुडवले जातात.

आता याचं समाधान काय?

समाधान असं की आलेल्या सगळ्या पाहुण्यांना मंगलाष्टकांच्या वेळी हातात फुलांच्या पाकळ्या देवून जेव्हा पाहुणे नवविवाहित दांपत्याला भेटायला स्टेजवर जातात त्यावेळी एखाद्या वाटीमध्ये ठेवलेल्या ‘अक्षता’ थेट त्या दोघांच्या डोक्यावर टाकून त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्या. बरंच सोपं आहे नाही का?

मी अनेक लोकांना अक्षता ऐवजी अक्षदा म्हणताना ऐकलं आहे. अनेक लोक अक्षता म्हणावं की अक्षदा म्हणावं या द्वंद्वामध्ये चक्क तांदूळ म्हणून मोकळे होतात. आता अक्षता  म्हणावं की अक्षदा म्हणावं हा वादाचा मुद्दा असू शकतो, पण अगदी व्याकरणाचा विचार केलाच तर, अक्षता हा शब्द जास्त बरोबर आहे.