Just माहितीसाठी

मराठी आणि महाराष्ट्राबद्दल बरंच काही…

श्रावण महिन्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन: सण, परंपरा आणि आरोग्याचे विज्ञान | Just Mahitisathi

श्रावण महिना हा सगळ्या महिन्यांचा राजा आहे असं मी बऱ्याच जणांना म्हणताना ऐकलेलं आहे, आणि ते एका अर्थाने खरं ही आहे कारण श्रावण महिन्यातल्या बहुतांश दिवशी कुठला न कुठला सण साजरा केला जातो. नागपंचमी, नारळीपौर्णिमा , जन्माष्टमी (कालाष्टमी) , बैलपोळा इत्यादी सण साजरे केले जातात. जेवढं या महिन्याला धार्मिक महत्व आहे, तेवढंच किंवा त्याहीपेक्षा जास्त वैज्ञानिक महत्व आहे.

आपल्या आधीच्या लोकांनी बऱ्याच गोष्टींना धार्मिक दृष्टिकोन जरी दिलेला असला तरीही Just माहितीसाठी म्हणून का असेना पण आपण या सगळ्या गोष्टींकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला हवं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढं विज्ञानाला महत्व आहे तसंच प्रतीकवादाला (Symbolism) सुद्धा फार महत्व आहे, असं माझ्या पाहण्यात आलं आहे.

  • श्रावण महिन्यामध्ये केस कापू नये असं का म्हणतात?

हा प्रश्न मी लहान असताना मला अनेक वेळा पडला आहे आणि वयाने मोठे झालेल्या बऱ्याच लोकांना अजूनही हा प्रश्न पडला असणारे. दरवर्षी पडत असणारे! श्रावणात केस न कापण्याची दोन कारण आहेत.

पहिलं कारण प्रतीकवादामध्ये आहे, म्हणजे श्रावण महिन्यात शेतातली पिकं पावसामुळे आपोआप च वाढत असतात, आणि त्यांची काट-छाट करणं हे निसर्गाच्या नियमांच्या विरोधात जाण्यासारखं आहे, आणि डोक्यावरच्या केसांना जर आपोआप वाढणाऱ्या पिकांसारखं मानलं तर त्यांना कापणं हे निसर्गाच्या नियमांच्या विरोधात जाण्यासारखं होईल म्हणून श्रावणात केस कापत नसत. (अर्थात यासाठी स्वच्छता म्हणजेच हायजीन डावलणं अजिबात योग्य नसतं.)

पण आपल्या भारतामध्ये कोणत्याही गोष्टी मागच्या कारणांची यादी ही एका आकड्यावर थांबत नाही, आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की यामागे एक वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. ते कारण असं की आज आपल्याकडे केस कापण्यासाठी जी आधुनिक यंत्रसामग्री आहे, ती पूर्वीच्या काळी नव्हती आणि पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरावर कोणती जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही आणि बऱ्याचदा तर ती जखम चिघळतेसुद्धा, म्हणूनच तेव्हा त्या जखमा होऊ नये आणि स्वास्थ्य नीट राहावं म्हणून ही श्रावणात केस न कापण्याची पद्धत रूढ झाली.

मला अजून एक प्रश्न पडायचा तो म्हणजे,

  • श्रावणात बरेच लोक कांदा-लसूण खाणं का टाळतात किंवा बंदच का करतात?

याचं मात्र मला एक अत्यंत शुद्ध असं वैज्ञानिक कारण सापडलं. कांदा आणि लसूण या दोन्ही भाज्या जमिनीच्या खाली उगतात. श्रावणात पावसाळा असतो आणि जमिनीवरचे जंतू पावसामुळे जमिनीमध्ये जाऊन भाज्या दूषित करू शकतात, आणि पूर्वी झाल्या ही असतील, आणि दूषित भाज्या खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकतं. म्हणूनच श्रावणात कांदा-लसूण न खाण्याची पद्धत पडली असावी. अर्थात आधीच्या काळामध्ये आता सारखे पिकांच्या रक्षणासाठी औषध नसल्या कारणाने त्यांनी कांदा लसूण आणि जमिनीखाली पिकणाऱ्या भाज्या न खाणच हे लाभदायक होतं.

  • शिवलिंगावर दुग्धाभिषेक का केला जातो?

श्रावण महिन्याचा आणि भगवान शिवाचा फार जवळचा संबंध आहे. श्रावण महिन्यात शिवाची भक्ती केली जाते , ती भक्ती करण्यासाठी भगवान शिवाला (शिवलिंगावर) जलाभिषेक, दुग्धाभिषेक इ. अभिषेक केले जातात. हे दुग्धाभिषेक का केले जायचे? या प्रश्नाचं उत्तर थेट पुराणामध्ये आहे. समुद्रमंथन चालू असताना जेव्हा त्यातून हलाहल बाहेर पडलं तेव्हा भगवान शिवांनी ते प्राशन करून आपल्या कंठामध्ये साठवून ठेवलं आणि तेव्हापासून त्यांचं एक नाव नीलकंठ हेसुद्धा पडलं.

शिवलिंगावर दुग्धाभिषेक का करतात याचं उत्तर वैज्ञानिक दृष्टिकोनाने आणि प्रतीकवादाने जोडलेलं आहे. वरच्या परिच्छेदामध्ये आपण वाचलं की जमिनीवरचे जीव जंतू जमिनीमध्ये शिरतात आणि झाडांच्या मुळांना दूषित करतात, तसंच आधीपासून जमिनीखाली असलेले कीडे आणि जंतू हे पावसामुळे जमिनीच्या वर येतात. गायी म्हशींचा आहार म्हणजे शेतातील गवत. आता जनावरं जेव्हा हे दूषित गवत खातात तेव्हा त्यांच्या दुधामध्ये ही दोष येणं स्वाभाविक आहे, जे दूध मनुष्याचे आरोग्य खराब करू शकतं, त्यामुळे हे दूध थेट पिण्यायोग्य न राहिल्याने वाया घालवण्याऐवजी त्याचा उपयोग अर्पण करण्यासाठी झाला.

आणि लोक प्रार्थना करायचे की “महादेवा जसं आपण अमृतमंथनावेळी हलाहल प्राशन करून या सृष्टीला विध्वंसापासून वाचवलं होतं, तसं हे मनुष्याला हानिकारक दूध आम्ही तुला अर्पण करतो, आमची अशीच रक्षा करीत रहा! “ मग दुग्धाभिषेक होऊन ते दूध एका पोकळीमधून मंदिराबाहेर पडायचं जिथून ते दूध इतर प्राणिमात्रांच्या कामी यायचं.

अर्थात ही Just माहितीसाठी जरी असली तरी ही माहिती फारच कमी होती, आणि मला विश्वास आहे की श्रावण महिन्यामध्ये अजून ज्या ज्या गोष्टी केल्या जायच्या किंवा अजूनही केल्या जातात त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपले स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठीच केल्या जातात. ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ब्लॉग पोहोचवा जेणेकरून आपल्या भारतीय संस्कृतीचा हा वैज्ञानिक पैलू सर्वांना नक्की कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

One response to “श्रावण महिन्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन: सण, परंपरा आणि आरोग्याचे विज्ञान | Just Mahitisathi”

  1. Sanikaa Avatar

    Just mahiti sathi ahe but really helpful, to know our culture in simple way